Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

या विभागात

स्पर्धक लक्षात असणे

स्पर्धक लक्षात असणे

कोणत्याही व्यावसायिकाला व्यवसायात यशस्वी होण्यासाठी बाजारपेठ आणि प्रतिस्पर्धी यांची माहिती असावी लागते. आम्हाला कोणी प्रतिस्पर्धी नाहीच, ही वृत्ती व्यावसायिकासाठी धोक्याची घंटाच असते. त्यामुळे यशस्वी व्यावसायिक आपल्या उत्पादनातील बदलां इतकेच प्रतिस्पर्धी उत्पादनांच्या बदलांकडेही लक्ष देत असतो.  

झपाट्याने वाढत आणि बदलत चाललेल्या बाजारपेठेत स्पर्धा नाही, असा कोणताही व्यवसाय उरला नाही. व्यवसायाचे स्वरूप आणि व्यावसायिक यांच्या परत्वे स्पर्धेचे प्रमाण कमी जास्त असले, तरी स्पर्धा आहेच. मग ती प्रत्यक्ष असो किंवा अप्रत्यक्ष, समान बाजारपेठेत असो किंवा भिन्न, समान उत्पादनात वा वेगवेगळ्या उत्पादनात असो. स्पर्धा हे कोणत्याही व्यवसायाचे एक अविभाज्य भागच बनले आहे. स्पर्धा ही गरजेनुसार उत्पादनात केले जाणारे बदल, उत्पादनाची बाजारातील पत, किंमत अशा अनेक पातळीवर सुरू असते. त्यासाठी स्वत:च्या व्यवसायाइतकेच लक्ष प्रतिस्पर्ध्यांवरही असावे लागते. त्यासाठी प्रतिस्पर्ध्यांबाबतच्या काही गोष्टींकडे कानाडोळा करून चालत नाही. 

उदाहरणार्थ.

* तुम्ही पुरवत नाही, अशी कोणती सेवा प्रतिस्पर्ध्यांकडून पुरवली जाते.

* ग्राहकांनी दिली जाणारी वागणूक कशी आहे.

* व्यवहारासाठी रोखीवर भर दिला जातो की उधारीवर. उधारीवर असेल, तर त्याचे साधारण प्रमाण किती आहे. 

* वस्तूंची खरेदी केलेल्या ग्राहकांची अथवा उत्पादनाबद्दल चौकशी केलेल्या संभाव्य ग्राहकांची नोंद ठेवली जाते का.

* ग्राहकांना नंतर संपर्क साधून वस्तू वा सेवेच्या दर्जाबाबत विचारणा केली जाते का. तितक्याच तत्परतेने ग्राहकांच्या शंकांचे निरसन केले जाते का.

* उत्पादन आणि उत्पादक यांचा इतिहास काय आहे. उत्पादनाबाबत अंतिम निर्णय घेणारी व्यक्ती कोण आहे.

* प्रतिस्पर्ध्याच्या सेवा वा विक्रीच्या वेळा काय आहेत. 

* प्रतिस्पर्ध्यांकडून जाहिरातींवर साधारणपणे किती खर्च केला जाते. किती कालावधीच्या अंतराने जाहिरात केली जाते. (वर्तमानपत्रे, रेडिओ, टीव्ही अशा कोणत्याही प्रसारमाध्यमांद्वारे) जाहिरात कोणत्या पद्धतीने साकारली जाते.

* प्रतिस्पर्ध्याकडे असलेले भक्कम वा कमकुवत गुण कोणते आहेत.  

* उत्पादनांची प्रमुख वैशिष्ट्ये.

* त्यांची बाजारातील पत काय आहे.

* उत्पादनाची किंमत किती आहे. त्यात कमी किंवा वाढ केली जाते का. कधी केली जाते.

* कर्मचारी किती आहेत. त्यांना प्रशिक्षण दिले आहे का. विपणनाची जबाबदारी कोण सांभाऴत आहे.

अशा बाबी अनेक मार्गाने जाणून घेता येतात. त्यापैकी ग्राहक हा एक महत्त्वाचा मार्ग आहे. या बाबी केवळ जाणून घेऊन उपयोगाचे नाही, तर त्या दृष्टीने स्वत:च्या उत्पादनात आणि निर्णयात बदल करण्याची गरज असते. महत्त्वाचे म्हणजे आपल्या उत्पादनावरही प्रतिस्पर्ध्याचे लक्ष असते, याकडे दुर्लक्ष करून चालत नाही.   

 

- सरिता सोनावणे

4
सरासरी 4 (2 votes)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation