Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

क्रेडिट कार्डचे फायदे आणि तोटे

क्रेडिट कार्ड वापरायला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या मित्र-मैत्रिणींपैकी किंवा ऑफिसमधील सहकाऱ्यांपैकी कोणी ते वापरत आहे का, त्याचा त्यांना काय फायदा होतोय किंवा त्याचा वापर करताना त्यांना कोणती समस्या जाणवते का, याचा अभ्यास करायला हवा. त्यानंतरच, आपल्याला त्याचा खरंच उपयोग आहे का किंवा ते कार्ड आल्यानंतर आपण ते सारखे वापरू की त्याचा वापर मर्यादित स्वरूपात ठेवू शकू, याचा परामर्श घेतल्याशिवाय क्रेडिट कार्ड वापरण्याची घाई करता कामा नये. क्रेडिट कार्ड वापरण्यापूर्वी ते वापरणा-या व्यक्तींकडून विविध अनुभव गोळा करून त्याची तुलना आपल्या वापराशी केली आणि त्यामध्ये फायद्यांचे पारडे जड असेल, तर क्रेडिट कार्ड वापरण्यास काहीही हरकत नाही.

■ क्रेडिट कार्डचे फायदे :

क्रेडिट कार्ड वापरण्याचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे तुमच्या हातात रोख रक्कम नसेल किंवा आर्थिक चणचण असेल, तर त्यासाठी तुम्हाला ४५ ते ५० दिवसांचा कालावधी मिळतो. म्हणजे, फर्निचर, टीव्ही किंवा यासारखी एखादी महागडी वस्तू घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी हातात कॅश उपलब्ध नाही. तर अशावेळी क्रेडिट कार्डचा वापर फायदेशीर ठरू शकतो. पुढील महिन्याभरात कॅश उपलब्ध झाल्यानंतर तुम्ही ती रक्कम खात्यावर जमा करू शकता. आजकाल तर अशा अनेक वस्तू घेताना क्रेडिट कार्डवर तीन किंवा सहा मासिक हप्त्याची सोय (ईएमआय) उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे, सर्व रक्कम एकरकमी भरण्याऐवजी अशा स्वरूपाच्या ऑफरचा लाभही घेता येऊ शकतो. 

आजकाल इंटरनेटद्वारे केल्या जाणा-या ऑनलाइन बुकिंगसाठी तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर करू शकता. एखाद्या सहलीसाठी परदेशी गेलात, तर तिथेही तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डचा वापर करू शकता आणि भारतात परतल्यानंतर त्यावरची रक्कम अदा करू शकता. तुमचं क्रेडिट लिमिट किती आहे, यानुसार खर्च करण्याची मर्यादा सांभाळलीत, तर क्रेडिट कार्डचा वापर उपयुक्त ठरू शकतो. 

■ क्रेडिट कार्डचे तोटे : 

क्रेडिट कार्ड वापरण्याचे काही तोटेसुद्धा आहेत. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, या कार्डच्या सततच्या वापरामुळं आपण अधिकाधिक कर्ज व्यवहार करू लागतो. म्हणजे, साध्या-साध्या रोख रक्कम अदा करून व्यवहार करता येण्याजोग्या गोष्टीही आपण क्रेडिट कार्डद्वारे घेण्याचा प्रयत्न करू लागतो. क्रेडिट कार्डचं एखाद्या महिन्याचं बिल थकलं, तर त्यावर आपल्याला व्याजासकट अधिक रकमेची परतफेड करावी लागते. क्रेडिट कार्डचा वापर करून बँकेतून किंवा एटीएममधून पैसे काढणेही तोट्याचे ठरू शकते. कारण, त्यावरही आपल्याला व्याज भरावे लागते. 

त्यामुळे, एका नाण्याच्या दोन बाजू असतात. त्याप्रमाणे, क्रेडिट कार्डचे फायदे आणि तोटेही असतात. त्याची तुलना करावी आणि आपल्या आवश्यकतेनुसार ते वापरायचे वा नाही, याचा निर्णय घ्यावा.

 

- मनीषा भावे

3.545455
सरासरी 3.5 (11 votes)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation