Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

क्रेडिट कार्डची शुल्क आकारणी

एखाद्या अनोळख्या ठिकाणी आपण गेलो आणि त्या ठिकाणी गेल्यावर पाकिटात पुरेसे पैसे नसल्याचं आपल्या लक्षात आलं तर काय होईल... याचा विचार करताना माझं क्रेडिट कार्ड वापरीन, असं उत्तर आजकाल स्वाभाविकचं दिलं जाईल. प्रत्येक ठिकाणी मोठी रक्कम सतत जवळ बाळगण्यापेक्षा अशा प्लॅस्टिक मनी, अर्थात डेबिट-क्रेडिट कार्ड जवळ बाळगणे आजकाल सर्वाधिक सोयीचे झाले आहे. पूर्वीच्या तुलनेत त्याची उपलब्धताही आजकाल सहज-सोपी झाली असल्याने क्रेडिट कार्ड न वापरणारी व्यक्ती सापडणंही दुर्मिळ झालंय. अर्थात, तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर करत असाल, तर त्यासाठी त्याची शुल्क आकारणी काय आहे, याची खडान् खडा माहिती ठेवणं अत्यंत जरूरीचं आहे. अन्यथा, काही कालावधीनंतर आपण क्रेडिट अर्थात कर्जाच्या विळख्यात सापडण्याची भीती असते. 

एखाद्या बँकेतून आपल्याला क्रेडिट कार्ड हवं का, याची चौकशी करण्यासाठी फोन येतो. त्यांच्यातर्फे कार्डवर उपलब्ध असणा-या विविध स्कीम्सची माहिती दिली जाते. ब-याचदा अशा स्कीमच्या मोहात पडून, बँकेचे कार्डचे चार्जेस किंवा शुल्क काय आहे, याची कोणतीही माहिती न घेता आपण त्यासाठी नोंदणी करतो. कालांतराने क्रेडिट कार्ड न वापरताही त्याचं बिल यायला लागलं, की बँकेच्या नावानं खडे फोडायला सुरुवात होते. त्यामुळे, कोणतेही कार्ड घेताना सर्वांत आधी त्याची वार्षिक फी, त्यासाठी भरावे लागणारे अतिरिक्त शुल्क, विलंब शुल्क किंवा इतर शुल्क (हिडन चार्जेस) याबाबतची नेमकी माहिती करून घ्यावी आणि मगच क्रेडिट कार्डच्या वापराला सुरुवात करावी. 

प्रत्येक बँकेनुसार क्रेडिट कार्डवरील शुल्काची आकारणी वेगवेगळी केली जाते. काही बँका सुरुवातीला एक वर्ष किंवा तीन-पाच वर्षे त्यावर कोणतेही शुल्क आकारत नाहीत. त्यानंतर, वार्षिक शुल्क सुरू होते. काही बँकातर्फे वार्षिक शुल्क आकारण्याऐवजी ठराविक व्यवहारांवर शुल्क आकारतात. त्यामुळे, क्रेडिट कार्डसाठी अर्ज भरताना या सर्व गोष्टींची नीट माहिती करून घ्यावी. एवढंच नाही, तर क्रेडिट कार्ड वापरायला सुरुवात केल्यानंतर जरी ४५ ते ५० दिवसांची मुदत मिळत असली, तरी त्या मुदतीमध्येच बिलाची रक्कम चुकती करावी. आर्थिक चणचण असल्याने बिल थकित ठेवल्यास त्यावर १२ ते ४५ टक्क्यांपर्यंतच्या व्याजाने शुल्क आकारणी केली जाते. त्यामुळे, क्रेडिट कार्डचा वापर करून मोठ्या रकमेची खरेदी केली असल्यास आणि ते बिल थकवल्यास येणारे पुढचे बिल तुमचे डोळे पांढरे करू शकते, हे लक्षात ठेवा. 

त्यामुळे, क्रेडिट कार्डच्या शुल्काबाबत अत्यंत सजग राहणे गरजेचे आहे. अन्यथा, हे शुल्क किंवा त्याद्वारे आकारले जाणारे छुपे शुल्क तुमचे जगणे उधार ठेवू शकतात.


- मनीषा भावे

 
5
सरासरी 5 (2 votes)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation