Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

कॉर्पोरेट गव्हर्नन्सचे फायदे

 कॉर्पोरेट गव्हर्नन्स

कॉर्पोरेट गव्हर्नन्सची माहिती तर आपण करून घेतलीच आहे. कंपनीचे व्यवस्थापन आणि कंपनीच्या भागधारक या दोघांसाठीही ही संकल्पना फायद्याचीच ठरत असल्याचे समोर येत आहे. कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि कॉर्पोरेट ऑडिट यामधील पारदर्शक व्यवहारांमुळे भागधारकांचा कंपनीवरील विश्वास अधिक दृढ होण्यासही मदत मिळत आहे. कंपन्यांचे अर्धवार्षिक निकाल प्रसिद्ध करणे, किंबहुना सध्याच्या काळात तर कंपन्यांचे तिमाही निकालही प्रसिद्ध केले जातात. कंपन्यांच्या वार्षिक अहवालात अनेक बारीकसारीक तपशील उघड करण्याची पद्धतही कंपनीच्या पारदर्शक कारभाराचे निदर्शक ठरते. यातून, कंपनीचा लाभ तर होतोच, पण भागधारकांचा विश्वासही वाढल्याने दुहेरी हेतू साध्य होतो. 

कॉर्पोरेट गव्हर्नन्सचे आणखीही काही फायदे आहेत. यामुळे संचालक मंडळाचे कार्य, त्यांच्यासाठीचे नियम, त्यांच्या कार्यपद्धतीसाठीच्या अटी आणि त्यांची जबाबदारी निश्चित करणे शक्य होते. कंपनी व्यवस्थापनातील प्रत्येक संचालकासाठी कोड ऑफ कंडक्ट स्थापित करणे आणि त्यात धर्तीवर भागधारकांसाठीही त्यांची अंमलबजावणी करणे यामुळे शक्य होते. काही ठराविक काळानंतर याचा आढावा घेऊन शक्य असल्यास त्यामध्ये आवश्यकतेप्रमाणे बदलही करता येऊ शकतात. 

कंपनीच्या एकूण सुनियोजित कारभारासाठी प्रत्ये व्यवहार पारदर्शक चौकटीत राहणे, केव्हाही हिताचे असते. त्या दृष्टीने कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि कॉर्पोरेट ऑडिटचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कंपन्यांचे तिमाही, सहामाही, नऊमाही आणि वार्षिक ताळेबंद जाहीर करणे, आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला ठेवलेल्या उद्दिष्टांनुरूप कंपनीचे कामकाज चालले आहे की नाही याचा आढावा घेणे, कंपनीच्या नव्या प्रकल्पांबद्दल किंवा नव्या गुंतवणुकीविषयीची माहिती भागधारकांना करून देणे, कंपनीच्या आर्थिक ताळेबंदाची लेखापालाच्या पडताळणीची प्रत सर्वांना पाठविणे, अशा एक ना अनेक बाबी यामुळे साध्य होऊ शकतात. कंपनीचा व्यवहार जोखण्यासाठी ऑडिट कमिटीची स्थापनाही केली जाते. या कमिटीच्या माध्यमातून कंपनीचे अंतर्गत ऑडिटही केले जाते. त्यातून, कंपनीची आर्थिक परिस्थिती किंवा गेल्यावर्षीच्या तुलनेत सध्याची स्थिती याचा मागोवा घेता येऊ शकतो. 

कंपनीच्या आर्थिक व्यवहारांमध्ये शिस्त आणण्यासाठी, कंपनीच्या व्यवहारांमधील पारदर्शकता जपण्यासाठी आणि भागधारक तसेच व्यवस्थापन यांच्यामधील दुरावा कमी करून त्यांना कंपनी हिताच्या दृष्टीने प्रेरित करण्यासाठी अलीकडच्या काळात या सर्व नित्याच्या बाबी झाल्या आहेत. मात्र, त्या तेवढ्याच निकडीच्याही आहेत. त्यामुळेच, कॉर्पोरेट गव्हर्नन्स किंवा कॉर्पोरेट ऑडिटला टाळून पुढे जाण्याचा प्रयत्न कंपन्यांकडून होताना दिसत नाही. 


– योगेश नामजोशी
    सनदी लेखापाल (Chartered Accountant)  

 संकलन  - मनीषा भावे

4.166665
सरासरी 4.2 (6 votes)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation