Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

कॉर्पोरेट गव्हर्नन्सचे नियम

एखाद्या कंपनीमधील जमा-खर्चाच्या हिशेबाची तपासणी करणे किंवा एकूणच सर्व आर्थिक व्यवहारांचा पडताळणी करण्यासाठी कॉर्पोरेट ऑडिट ही संकल्पना राबविली जात असते. कंपनी कायदा १९५६ नुसार नोंदणी झालेल्या सर्व कंपन्या (काही अपवाद) तसेच शेअर-मार्केटमध्ये नोंदणी झालेल्या कंपन्यानी ऑडिट करून घेणे बंधनकारक आहे. हा नियम अस्तित्वात असला, तरीही अद्याप अनेक कंपन्या त्याला बगल देत असल्याने नव्या कंपनी कायद्यात ऑडिटची व्याप्ती अनिवार्य करण्याचा विचार केला जात आहे. कंपन्यांची विश्वासार्हता टिकविण्यासाठी ऑडिटला बहुतांश कंपन्या महत्त्व देत असल्या, तरी त्याचा वापर सर्वसमावेशक नाही, हे सत्य लपवून चालणार नाही. 

कायद्यातील २९२-अ या कलमानुसार ऑडिटसाठी ऑडिट कमिटी स्थापन करण्याचे बंधन कंपन्यांना घालण्यात आले आहे. बहुतांश कंपन्यांमध्ये दोन प्रकारचे ऑडिट केले जाते. कंपनीशी संबंधित नसलेल्या बाहेरच्या व्यक्तीकडून, लेखापालाकडून किंवा वित्तीय संस्थेमार्फत एक्स्टर्नल ऑडिट करून घेतले जाते.सार्वजनिक आणि खासगी या दोन्ही प्रकारच्या कंपन्यांसाठी ऑडिट सक्तीचे असून, त्यामुळे कंपनीची आर्थिक स्थितीची नेमकी माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचू शकते. सलग तीन वर्षे कंपनीचा आर्थिक ताळेबंद सादर न करणा-या किंवा ऑडिट रिपोर्ट भागधारकांपर्यंत न पोहोचविणा-या संचालकांना बरखास्त करण्याची अटही कॉर्पोरेट ऑडिटच्या अटींमध्ये आहे. ऑडिट रिपोर्टसह पाठविल्या जाणा-या संचालक अहवालामध्येही संचालकांच्या जबाबदा-यांचा उल्लेख करणे बंधनकारक करण्यात आले आहे. कंपनीतील संभाव्य आर्थिक अनियमितता, गैरव्यवहार, फसवणूक या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी नियमानुसार प्रत्येक आर्थिक वर्ष संपल्यानंतर ऑडिट करून घेणे सक्तीचे करण्यात आले आहे. 

एक्स्टर्नल ऑडिटप्रमाणेच इंटर्नल ऑडिटलाही विशेष महत्त्व देण्यात आले आहे. या ऑडिटमुळे कंपनीची अंतर्गत परिस्थितीची नेमकी जाणीव संचालक मंडळाला होऊ शकते. इंटर्नल ऑडिट कंपन्यांवर सक्तीचे नसले, तरीही नियमानुसार ते करून घेणे कंपनीच्या दीर्घकालीन फायद्यासाठी उपयुक्त ठरते. कंपनीची विश्वासार्हता वाढण्यासाठी, भागधारकांना कंपनीच्या व्यवहारांविषयी खात्री वाटण्यासाठी आणि व्यवस्थापनाला कंपनीचा डोलारा नीट सांभाळता यावा, यासाठी ऑडिटची अट घालण्यात आली आहे. अजूनही ब-याच कंपन्या त्याकडे कानाडोळा करत असल्या, तरी कंपनीच्या भल्यासाठी घालण्यात आलेल्या ऑडिटविषयक अटी आणि नियम सर्वांसाठीच उपयोगाच्या ठरतात. 

मुलाखत – योगेश नामजोशी
सनदी लेखापाल (Chartered Accountant)  

 

- मनीषा भावे

1
सरासरी 1 (1 vote)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation