Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

कॉर्पोरेट गव्हर्नन्स – दैनंदिन वापर

 कोणत्याही कंपनीतील कॉर्पोरेट गव्हर्नन्स ही संकल्पना कंपनीचा व्यवहार, आर्थिक प्रदर्शन आणि भागधारकांच्या हितसंबंधविषयक प्रकरणांशी संबंधित मुद्यांच्या न्याय आणि पारदर्शक प्रकटीकरणावर आधारलेली आहे. व्यवहार्य पद्धतीने कंपनीचे व्यवस्थापन करणे आणि त्याचवेळी वैयक्तिक हितापेक्षा सार्वजनिक हिताला प्राधान्य देणे, या दोन तत्त्वांवर कॉर्पोरेट गव्हर्नन्सचा पाया उभा राहिला आहे. कंपनीचे व्यवस्थापन आणि भागधारक यांच्या गरजा आणि उद्दिष्टे वेगवेगळी असल्याने निर्माण होणा-या विसंवादातून कंपनीच्या हिताचा योग्य मार्ग काढण्याचे काम कॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या माध्यमातून होऊ शकते. 

अर्थव्यवस्थेत उद्योगांची भूमिका महत्त्वाची असल्याने असमर्थनीय व अनैतिक कामगिरीमुळे जेव्हा एखाद्या उद्योगाचे मोठे नुकसान होते, तेव्हा त्याचा फटका कंपनी व्यवस्थापनाला तर भोगावा लागतोच, पण त्यामुळे भागधारकांचेही मोठे नुकसान होते. त्यामुळेच, कंपन्यांच्या प्रशासनात कॉर्पोरेट गव्हर्नन्सला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. ऑडिट कमिटी येणार म्हणून कॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या अंतर्गत येणा-या गोष्टींचा अंतर्भाव करायचा किंवा केवळ कायद्यानुसार दाखविण्यासाठी काही महिन्यांपुरतेच ऑडिट करायचे, अशा दृष्टीने त्याचा वापर केला गेला, तर कंपनीची विश्वासार्हता धोक्यात येण्याचा संभव आहे. त्यामुळे, वन्स इन ब्लू मून याऐवजी सातत्याने दैनंदिन कामकाजातही त्याचा अंतर्भाव करणे, हे सध्याच्या काळात प्रत्येक कंपनीपुढील उद्दिष्ट झाले आहे. 

कॉर्पोरेट गव्हर्नन्सचा दैनंदिन वापर म्हणजे नक्की काय, असा प्रश्नही अनेकदा पडू शकतो. मात्र, त्याचे उत्तर अगदी सहज, सोपे आहे. पूर्वी शाळेत दिलेला होम-वर्क ज्याप्रमाणे आपण त्या-त्या दिवशी पूर्ण करण्यासाठी प्राधान्य द्यायचो, अगदी त्याच धर्तीवर व्यवस्थापनाने ठरवलेले ध्येय गाठण्यासाठी, भागधारकांचा फायदा करून देण्यासाठी उंच उडी मारून ईप्सित साध्य करण्याऐवजी रोज एक-एक पाऊल पुढे टाकून लक्ष्य गाठणे अधिक सोपे आहे. यासाठी, अगदी संचालक मंडळाच्या बैठकीसाठी होणा-या खर्चापासून ते कंपनीच्या उत्पादनासाठी येणारी कॉस्ट कमी करण्यासाठीचे प्रयत्न अशा अनेक गोष्टींचा समावेश करता येऊ शकेल. दीर्घकालीन फायद्याचा विचार करता एखाद्या ठिकाणी होणारी गुंतवणूक टाळण्यापासून ते गरज नसताना करण्यात येणा-या कर्मचा-यांच्या भरतीला मर्यादा घालण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट कॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या निकषांवर आपल्याला ताडता येऊ शकते, त्यादृष्टीने काही सुधारणा करता येऊ शकतात. 

कॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या सातत्यपूर्ण वापरातून भागधारक आणि व्यवस्थापन या दोन्ही महत्वपूर्ण घटकांची विचारधारा एक होऊ शकते आणि त्यातून कंपनीच्या हिताची धोरणे राबविण्यासाठी परस्पर सहकार्य वृद्धिंगत होण्यास मदत मिळते. 

मुलाखत – योगेश नामजोशी
सनदी लेखापाल (Chartered Accountant)  

 

- मनीषा भावे

4
सरासरी 4 (1 vote)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation