Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

रोजगारासाठीचे अकाऊंटींग

वाणिज्य शाखेचा अभ्यास करणा-या प्रत्येकालाच अकाउंटिंगचा अभ्यास करावाच लागतो. महाविद्यालयात केलेल्या या अभ्यासातून प्रत्येक जणच अकाउंटिंगमध्ये करियर करेलच याची खात्री आजकाल देता येत नाही. परंतु, किमान वाणिज्य पदवीधराला अकाउंटिंगबाबतचे मूलभूत ज्ञान नक्कीच असते. त्यामुळे, अकाउंटिंगचा अभ्यास रोजगारासाठी उपयुक्त ठरतो. 

पैशांचे व्यवहार जोपर्यंत होत राहतील, तोवर अकाउंटिंग देखील कायम राहील. याचाच अर्थ असा, की अकाउंटिंगचे योग्य प्रशिक्षण घेतल्यावर त्यातील कौशल्ये आत्मसात केली, तर अकाउंटिंगद्वारे उत्तम नोकरी, रोजगार मिळू शकतो. छोट्या स्वरुपात व्यवयास करणा-या एखाद्या स्वयंसेवी संस्थेपासून ते मोठ्या प्रमाणावर उद्योग, व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांपर्यंत आणि सार्वजनिक विश्वस्त संस्था, हॉटेल यांच्यापासून ते बहुराष्ट्रीय कंपन्यांपर्यंत प्रत्येकालाच अकाउंटिंगचे सखोल ज्ञान असणऱ्या उमेदवारांची आवश्यकता असते. अनुभव आणि कौशल्यांनुसार अकाउंटिंगमध्ये रोजगाराची उत्तम संधी लाभू शकते. तसेच, त्यातील सखोल ज्ञान आणि त्याच्याशी संबंधित इतर घटकांची संपूर्ण माहिती करून घेतली, तर अकाउंटिंगद्वारे प्रगती साधण्यात कोणतीची अडचण येत नाही. 

सध्याच्या काळात अकाउंटिंग हे केवळ पूर्वीसारखे एन्ट्रीपुरते मर्यादित राहिलेले नाही. वेळोवेळी सरकारने बदललेल्या नियमांमुळे आजकाल प्रत्येक व्यवसायाला अकाउंटिंगसह इतर विविध कर कायद्यांची माहिती ठेवणे, त्यात बदलणा-या अटी-नियमांची पूर्तता करणेही आवश्यक झाले आहे. त्यामुळे, केवळ अकाउंटिंगमध्ये मास्टरी मिळवली, म्हणजे उत्तम रोजगार मिळाला, अशी स्थिती सध्या राहिलेली नाही. त्यामुळेच, अकाउंटिंगसह व्हॅट, टीडीएस, सेवा कर, विक्रीकर, प्राप्तीकर अशा अनेक पूरक घटकांची माहितीही अकाउंटिंगमध्ये करियर करण्यासाठी ठेवावीच लागते. त्यामुळे, या सर्वांचे सखोल ज्ञान ठेवणारी कोणीही व्यक्ती अकाउंटिंगमध्ये उच्च पदापर्यंत सहज पोहोचू शकते. 

तसेच, गेल्या काही वर्षांमध्ये रोजगारासाठी अकाउंटिंग करायचे असेल, तर वेगवेगळ्या ठिकाणी वापरली जाणारी अकाउंटिंगच्या सॉफ्टवेअरचे ज्ञान असणेही गरजेचे झाले आहे. प्रामुख्याने बहुतांश ठिकाणी टॅली या सॉफ्टवेअरवर काम चालते. तर मोठमोठ्या कंपन्यांमध्ये सॅपवर काम करण्याची पद्धत आहे. या दोन्ही सॉफ्टवेअरमधील अद्ययावत ज्ञान मिळविणे, त्यातील नव्या गोष्टी शिकण्यासाठी पाठपुरावा करणे, हे देखील रोजगारासाठी आवश्यक झाले आहे. 

एन्ट्री, नॅरेशन, पी अँड एल अकाउंट आणि बॅलन्सशिट यापुरते सध्याचे अकाउंटिंग मर्यादित राहिलेले नाही. त्यापुढे जाऊन त्याच्याशी पूरक गोष्टींचे ज्ञान आत्मसात केले नाहीत, तर रोजगारासाठीच्या अकाउंटिंगमध्ये तुमच्या कौशल्यांचा ताळेबंद नीट जुळणार नाही, हे निश्चित.

- मनीषा भावे

 

0
No votes yet
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation