Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

अकाऊंटींगचे प्रकार

कोणत्याही ठिकाणी पैशाच्या व्यवहार झाला, की त्याची एन्ट्री केली जाते आणि तो कशासाठी झाला याचे नॅरेशनही (संदर्भ) लिहिले जाते. प्रत्येक व्यवहाराची नोंद ठेवल्या जाणाऱ्या प्रकाराला ‘अकाउंटिंग’ म्हणतात. एखादा व्यवसाय असो, वा पार्टनरशिप फर्म किंवा बँक असो वा, भाजी व्यावसायिकांचा गाळा, अशा सर्व ठिकाणी अकाउंटिंगशिवाय पैशाच्या व्यवहारांचे पान हलत नाही. स्वयंसेवी संस्था, ट्रस्ट आणि सरकारी पातळीवरही अकाउंटिंगला कोणताही पर्याय नाही. 

प्रत्येक व्यवसाय, संस्था यांच्या निकडीनुसार अकाउंटिंगची पद्धत निरनिराळी असते. यामध्ये प्रामुख्याने दोन प्रकारांचा समावेश होतो. त्यातील पहिला प्रकार म्हणजे कॅश आणि दुस-या प्रकाराला ऍक्रुअल किंवा मर्कन्टाईल असे म्हणतात. कॅश म्हणजेच रोख रक्कम मिळाली किंवा द्यावी लागली, तर कॅश प्रकाराने अकाउंटिंगची नोंद केली जाते. प्रामुख्याने सार्वजनिक विश्वस्त संस्था, स्वयंसेवी संस्था आणि सोसायट्यांतर्फे या प्रकारच्या अकाउंटिंगला प्राधान्य दिले जाते. या पद्धतीत रोख रकमेची ये-जा होत असल्याने नेमकी जमा किती आणि खर्च कुठे झाला, याचा ताळेबंद ठेवता येणे शक्य होते. अकाउंटिगंची फारशी ओळख नसणा-या किंवा त्याविषयी अज्ञानी व्यक्तींना रोजच्या व्यवहारासाठी ही मूलभूत पद्धत उपयोगी पडते. परंतु, हातात येणाऱ्या आणि खर्च होणाऱ्या रोख रकमेची वारंवारता निश्चित नसल्याने व्यवसायाच्या नेमक्या आर्थिक स्थितीचा अंदाज येऊ शकत नाही. 

मोठे उद्योग व्यवसाय आणि कंपन्या यांच्याकडून मात्र मर्कन्टाईल किंवा ऍक्रुअल पद्धतीचा अवलंब केला जातो. या पद्धतीत जमा आणि खर्च यांची नोंद (जरी प्रत्यक्षात ते मिळायला किंवा द्यायला वेळ लागला तरी) लगेच केली जाते. या पद्धतीमुळे कोणत्याही व्यवसायाची एकूण नफ्या-तोट्याची गणिते काय आहेत, याचा परामर्श घेणे सोपे जाते. 

सोप्या उदाहरणाद्वारे या दोन्हीतील फरक स्पष्ट करायचा झाल्यास, समजा मार्च २०१२ चा पगार हा जरी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात दिला गेला, तरी ऍक्रुअल पद्धतीनुसार आर्थिक वर्ष २०११-१२ मध्येच दाखविला जातो. परंतु, कॅश पद्धतीनुसार हा खर्च एप्रिल २०१२ च्या खर्चात समाविष्ट करून नव्या आर्थिक वर्षात नोंदविला जातो. आपल्या देशात कंपनी कायदा किंवा प्राप्तीकर कायद्यानुसार मर्कन्टाईल किंवा ऍक्रुअल पद्धतीचाच वापर करण्याची सक्तीही करण्यात आली आहे. 

अकाउंटिंगचा वापर केल्या जाणा-या या दोन पद्धतींशिवाय पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट्स आणि नॉमिनल अकाउंट्स असे तीन प्रकारही येतात. पर्सनल अकाउंट हे प्रामुख्याने व्यक्ती किंवा संस्था यांच्याशी निगडीत असते. रिअल अकाउंट्समध्ये मालमत्तेचा विचार केला जातो, तर नॉमिनल अकाउंट्समध्ये जमा, खर्च आणि नफा-तोटा यांचा ताळेबंद बांधला जातो. 

ढोबळ मानाने अकाउंटिंग अशा विविध प्रकारांमध्ये विभागले जाते. कोणत्याही व्यवसायाचे, संस्थेचे किंवा आपल्या हाती दर महिन्याला येणा-या पगाराचे सर्व गणित अकाउंटिंगच्या माध्यमातूनच सुटते, हे लक्षात ठेवायला हवे. 

 

- मनीषा भावे

 

0
No votes yet
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation