Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

अकाऊंटींगचा दैनंदिन वापर

अकाऊंटींग

कोणताही व्यवहार असो, जिथे पैशाचा वापर होतो किंवा पैशाची देवाण-घेवाण होते, तिथे अकाउंटिंगचा वापर होणे क्रमप्राप्त असते. रोजच्या रोज आपण वेगवेगळ्या ठिकाणी जातो, तिथे पैसे खर्च करतो, कधीतरी आपल्याला पैसे प्राप्त होतात, या सगळ्या गोष्टींची होणारी नोंद म्हणजेच खरेतर अकाउंटिंग. आपल्याकडे किती रक्कम उपलब्ध आहे, त्यातील किती खर्च झाली, महिनाअखेरीस किती शिल्लक राहिली याचा ताळेबंद मांडणे, किंवा उद्योग-व्यवसायाच्या भाषेत नफा-तोटा यांचा हिशेब मांडणे, यासाठी अकाउंटिंगद्वारे दैनंदिन नोंदी प्रत्येक ठिकाणी ठेवल्या जातात. 

आपल्या आजुबाजूला प्रत्येक ठिकाणी अकाउंटिंगचा वापर होत असल्याचे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याने कॉलेजची फी भरली, तर अशावेळी ती फी प्राप्त झाली म्हणून कॉलेजतर्फे त्याची नोंद केली जाते. त्या फी साठी बँकेतून ड्राफ्ट काढण्यात आला असेल, तर बँकेत त्याची नोंद होते, तसेच, त्या विद्यार्थ्याला फी देणा-या पालकांना ती रक्कम त्यांच्या पगाराद्वारे प्राप्त होत असल्याने त्यांची कंपनीही त्याची नोंद करत असते. त्यामुळे, अशा सर्व ठिकाणी अकाउंटिंगचा वापर होतच असतो. 

व्यवसायाच्या स्थितीची किंवा वैयक्तिक लाभाची स्थिती समजण्यासाठी अकाउंटिंगची नोंद व्यवस्थित ठेवणे आवश्यक असते. म्हणजे, नफा जास्त झाला, तर त्यापासून आणखी कुठे गुंतवणूक करायची का, किंवा वैयक्तिक स्तरावर हातात शिल्लक रक्कम अधिक असेल, तर कुठे शेअर्स किंवा जागेमध्ये ते पैसे गुंतवावेत, याचे निर्णय घेण्यासाठी देखील दैनंदिन अकाउंटिंग हिताचे ठरते. 

दैनंदिन अकाउंटिंग अचूक ठेवण्यावर मात्र कटाक्षाने लक्ष द्यावे लागते. कारण, जर एखादी नोंद चुकीची केली गेली, तर त्याचा परिणाम सर्वच पुढील गोष्टींवर होऊन चुकीचे चित्र निर्माण होऊ शकते. त्यामुळे, दैनंदिन स्तरावर अकाउंटिंगच्या नोंदी करताना डोळ्यात तेल घालून त्याचा हिशेब ठेवावा लागतो. तुम्ही बँकेत गेला असाल, तर कॅशियर त्याच्याकडील प्रत्येक व्यवहाराची नोंद लगेच त्याच्यासमोरील वहीमध्ये करत असल्याचे तुमच्या लक्षात आले असेल. म्हणजे दिवसाच्या शेवटी, किती रक्कम नागरिकांना दिली गेली आणि त्यांनी किती रक्कम त्यांच्या त्यांच्या अकाउंटला जमा केली, याचा ताळेबंद मांडता येतो. यामध्ये एखादी जरी गफलत झाली, तर त्याचा फटका ग्राहकांसह संबंधित कर्मचा-यालाही सहन करावा लागतो. त्यामुळे, अकाउंटिंगच्या दैनंदिन वापरामध्ये कोणतीही चूक होणार नाही, याची खबरदारी घ्यावीच लागते. 

आईस्क्रीम खरेदी, चित्रपटाचा आनंद लुटणे किंवा अगदी महानगरपालिकेचा कर जमा करणे, ही देखील अकाउंटिंगच्या दैनंदिन वापराची काही उदाहरणे आहेत. अकाउंटिंगशिवाय हिशेब आणि त्याचा पैशाच्या आवक-जावक याचा लेखा-जोखा मांडता येणे निव्वळ अशक्य आहे. 

- मनीषा भावे 

 

0
No votes yet
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation