Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

निवृत्तीनंतर स्वतःच्या बचतीचे नियोजन

गेल्या दीड ते दोन वर्षात बेसुमार वाढलेल्या महागाईमुळे सर्वसामान्य माणसाचे जीवन अधिकच अडचणीचे झाले आहे. या महागाईच्या दुष्टचक्रात अडकलेल्या काही ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनाची होणारी ससेहोलपट तर खरोखरच पाहवत नाही. पूर्वी बऱ्याच नोकरदारांना भविष्य निर्वाह निधीचे अर्थात पीएफचे व सरकारी नोकरदारांना पेन्शनचे कवच होते. परंतु, बदलत्या काळात गुंतवणुकीचे सर्वच पारंपरिक संदर्भ मागे पडत चालले आहेत. म्हणूनच त्यासाठी प्रत्येक कुटुंबाला आपले आर्थिक नियोजन करणे ही काळाची गरज आहे.

दिवसेंदिवस वाढणारा महागाईचा दर काही कमी होण्याची चिन्हे नाहीत. केवळ भाज्या,  फळे, प्रवासाचा खर्चच नाही, तर औषधोपचारांसाठी लागणारा खर्चही वाढतच चालला आहे. एका बाजूला खर्चाचे आकडे फुगत असताना, दुसरीकडे व्याजदराने मात्र त्यांची निम्न पातळी केव्हाच गाठली आहे. परिणामी विविध प्रकारच्या बचत- गुंतवणूक- ठेवींवरील व्याजांतून मिळणारे उत्पन्न आता आकर्षक राहिले नाही. याचा सर्वाधिक फटका दरमहा निश्चित उत्पन्न प्राप्त होणा-या निवृत्तीवेतनधारकांना, ज्येष्ठ नागरिकांना बसतो. सुरक्षित सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करायची थकवली, तर हवा तसा आर्थिक लाभ होत नाही आणि आकर्षक आर्थिक लाभाच्या मागे जायचे ठरवले, तर मुद्दल बुडण्याची भीती असते. सध्या ज्येष्ठ नागरिक याच विवंचनेत असल्याचे आढळते.

वाढलेली महागाई आणि घटलेले व्याजदर यांनी गुंतवणुकीचे पर्याय फारच मर्यादित केले आहेत. भांडवलाची सुरक्षितता प्राधान्याने जपणे, गरजेनुसार पैसे तात्काळ उपलब्ध करून देणारी गुंतवणुकीची रोखता किंवा रोकडसुलभता राखणे आणि त्याचबरोबर भाववाढीला समर्थपणे तोंड कसे द्यायचे हा खरा तर यक्षप्रश्नच म्हणावा लागेल. आयुष्यभर साठवलेली पुंजी निवृत्तीनंतरच्या चुकीच्या उत्पादनांमध्ये ओतून नुकसान करून घेण्यापेक्षा योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे केव्हाही अधिक श्रेयस्कर ठरते. 

निवृत्त गुंतवणूकदारांनी तीन प्रश्न विचारून गुंतवणूकविषयक उत्पादनांची नेहमी परीक्षा करावी 

  1. खर्चाच्या तुलनेत रिटर्न किती मिळतील ? 
  2. रिटर्न मिळवण्यासाठी किती काळ गुंतवणूक सुरू ठेवावी लागेल ?
  3. गुंतवणूक पर्यायात बदल करण्यासाठी लवचिकता किती आहे ? 

निवृत्तीच्या वेळी भविष्य निर्वाह निधी व इतर आर्थिक रक्कम एकरकमी हातात पडते.  एवढ्या मोठ्या रकमेचे काय करायचे,  हा सुद्धा प्रश्नच असतो. या वेळी विविध पर्यायांचा सल्ला देणारे बरेचजण असतात. आम्ही असेच केले, यातून एवढा फायदा झाला, यामुळे आयुष्य सुखकर झाले, अशा विविध गोष्टींची भलामण केली जाते. परंतु, या वयात मानसिकता ही जोखीममुक्त व स्थिर परतावा देणारी गुंतवणूक करण्याची असते. इतरांकडून मिळणा-या फुकटच्या सल्ल्यांमुळे क्वचित प्रसंगी असे भान ठेवण्याचे गांभीर्य राखले जात नाही.  

दर महिन्याच्या महिन्याला मिळणा-या मासिक पगाराचे उत्पन्न बंद झालेले असते. त्यामुळे गुंतवणूकीतून मिळणा-या व्याजातूनच खर्च करायचे आहेत, ही सवय लावून घेण्याची गरज असते. कारण, खर्च कुठूनही कमी झालेले नसतात. एखाद्या जीवनशैलीचा स्वीकार केल्यानंतर त्याच पद्धतीने राहण्याची सवय सहजासहजी मोडता येत नाही. त्यासाठी तडजोड करता येत नाही. त्यामुळे तरुणपणापासूनच निग्रहाने व सातत्याने केलेली गुंतवणूक व त्यातून योग्य परतावा मिळाला तरच आर्थिक आरोग्याचा समतोल राखणे शक्य होऊ शकते.  

भविष्य निर्वाह निधीचा वापर काही वेळा काही जण गावाकडे घर बांधणे किंवा नवीन घर घेताना खर्च करतात. वास्तविक ही वेळ हा खर्च करण्यासाठी नसते याचे भान राहत नाही. निवृत्तीचा काळ सुखात जावा असे वाटत असेल, तर योग्य नियोजनाला पर्याय नाहीचं. त्यामुळे वयाच्या पंचविशी-तिशीतच निवृत्तीवेतनाची तरतूद करून ठेवणे, हाच सर्वोत्तम मार्ग आहे.

निवृत्तीनंतर स्वतःच्या बचतीचे नियोजन विविध पर्यायाने झाले पहिजे. 

 

-  मनीषा भावे

 

 

 

3.375
सरासरी 3.4 (8 votes)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation