Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

शैक्षणिक असमर्थता

शैक्षणिक असमर्थता

शैक्षणिक असमर्थता (लर्निंग डीसअबिलिटी- Learning Disability) हा प्रकार पूर्वी लोकांना फारसा परिचित नव्हता. ’तारे जमीन पर’ या चित्रपटामुळे ‘शैक्षणिक असमर्थता’ या विषयावर मोठ्या प्रमाणात प्रकाश टाकला गेला. या चित्रपटाच्या निमित्ताने लर्निंग डीसअबिलिटी विषयावर खूप चर्चा झाली.

शैक्षणिकदृष्ट्या असमर्थ कुणाला म्हणतात ?

मुलांना वाचन, लिखाण, श्रवण, संवाद, गणित, तर्कशास्त्र ही कौशल्ये आत्मसात करण्यास अडचणी येतात. हा प्रकार ‘शैक्षणिक वेगळेपण’ (एज्युकेशनल डीफ्रंस - Educational Difference ) म्हणूनही ओळखला जातो. अशा व्यक्तींना सर्वसामान्य लोकांपेक्षा शिकण्यासाठी जास्त वेळ लागतो. या आजाराच्या वेगवेगळ्या छटा आहेत. अशाप्रकारची असमर्थता व्यक्तीप्रमाणे बदलत जाते. शास्त्रज्ञांच्या मते, व्यक्तीचा मेंदू कशाप्रकारे काम करतो आणि कशाप्रकारे माहितीचे रुपांतरण करतो ह्यावर ह्या दोषाची तीव्रता अवलंबून असते.

अशाप्रकारची कमतरता विशेषतः शाळकरी मुलांमध्ये आढळते. अशा मुलांना सर्वसामान्यांप्रमाणे शिक्षण देणे हे पालक व शिक्षक दोघांसाठीही अवघड काम असते.शैक्षणिक असमर्थता हा दोष फक्त लहान मुलांमध्ये असतो असे नाही, काही मोठ्या माणसांमध्येसुद्धा हा दोष असतो. अशा माणसांना कामाच्या ठिकाणी,घरी बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो.

शैक्षणिक असमर्थतेची लक्षणे

 • शब्दाचा उच्चार करताना अडचण येणे.
 • अचूक शब्द शोधता न येणे.
 • यमक जुळवता न येणे.
 • रंग, मुळाक्षरे, दिनांक, हे ओळखता न येणे.
 • पेन्सिल, कात्री, रंगखडू, इत्यादी धरताना अडचण होणे.
 • कपड्याचे बटन नीट लावता न येणे, चैन लावता न येणे, बुटाची लेस नीट बांधता न येणे.
 • अशी लक्षणं दिसली तरच ‘शैक्षणिक असमर्थता’ ही अडचण आहे असे नाही. पण ही लक्षणे फार मोठ्या प्रमाणात आढळून येतात.

शैक्षणिक असमर्थतेचे प्रकार

 • वाचन विषयक दोष (Dyslexia) ( डीसलेक्सिया)
 • गणितविषयक दोष (Dyscalculia)( डीसकाल्क्युलिया)
 • लेखनविषयक दोष ( Dysgraphia)( डीसग्राफिया)
 • भाषाविषयक दोष (Dysphasia)(डीसफेझिया)
 • सुसुत्रतेविषयक दोष (Dyspraxia)
 • श्रवणविषयक दोष
 • दृष्टी विषयक दोष

या दोषाचे काही प्रकार कधीही बरे न होणारे असतात. पण थोडासा धीर, मेहनत, योग्य वागणूक अशा माध्यमातून हा दोष असलेल्या मुलांमध्ये प्रगती पाहायला मिळते.
प्रसिद्ध अभिनेता अभिषेक बच्चन शैक्षणिक असमर्थतेवर मात करून यशस्वी झालेली व्यक्ती आहे. 


- श्रेया अयाचित

 

2.8
सरासरी 2.8 (5 votes)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation